उसाला ३ हजार १०० रुपये भाव द्यावा

Foto
 वैजापूर, (प्रतिनिधी): उसाच्या भावावरून तालुक्यातील ऊस उत्पादक आक्रमक झाले आहेत. त्यांनी तालुक्यातील महालगाव येथील पंचगंगा साखर कारखान्याने उसाला प्रतिटन ३१०० रुपये भाव द्यावा अशी मागणी केली आहे. 

पंचगंगा साखर कारखान्याने आतापर्यंत केवळ २८५० रुपये प्रति टन भाव दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्यातील नागमठाण येथे बैठक घेऊन या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार शेतकरी शुक्रवारी महालगाव येथील पंचगंगा साखर कारखान्यावर कारखान्याचे प्रभाकर शिंदे यांच्याशी बोलणी करण्यासाठी धडकणार आहेत. त्यातच कारखान्याच्या बदनामीवरून कारखान्याने एका शेतकऱ्याला मानहानीची नोटीस पाठवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हे ऊस प्रकरण चांगलेच पेटण्याची चिन्हे आहेत.

एक वर्षापूर्वी वैजापूर वैजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक आक्रमक महालगाव येथे पंचगंगा साखर कारखाना मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू झाला. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी तालुक्यातील ऊस उत्पादकांना इतर कारखान्यापेक्षा शंभर रुपये भाव अधिक देण्याची घोषणा केली होती. 

मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कमी भाव मिळाल्याने शेतकरी नाराज झाले. दहा टक्के उतारा असल्यास किमान किफायतशीर भावाच्या हिशोबाने शेतकऱ्यांना प्रति टन तीन हजार पाचशे रुपये भाव मिळायला हवा. मात्र, ठराविक कारखानेच हा भाव शेतकऱ्यांना देतात. अशा परिस्थितीत पंचगंगाने तीन हजार शंभर रुपये भाव दयावा अशी आमची मागणी आहे.

 अशी माहिती शेतकऱ्याने दिली. या शिवाय कारखान्याने शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे ऊस बेणे, कंपोस्ट खत देऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. आमचा कारखान्याला विरोध नाही, पण कारखान्याने किमान तीन हजार शंभर रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, एवढी अपेक्षा असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.